पाथर्डी -एकनाथवाडीचे सरपंच, सदस्य व पंचायत समिती सदस्य असताना गैरमार्गाने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमविण्याच्या कारणावरून मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर व त्यांच्या पत्नी सविता खेडकर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
देविदास लिंबाजी खेडकर यांनी एकनाथवाडी गावचे सरपंच व सदस्य असताना तसेच पंचायत समितीचे सदस्य असताना उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गैरमार्गाने जमवल्या बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खेडकर यांच्या संपत्तीची उघड चौकशी करण्यात आली. सन 2001 ते नोव्हेंबर 2018 पर्यंतच्या कालावधीतील उत्पन्नाचे परीक्षण करण्यात आले.
या परीक्षण कालावधीत खेडकर यांच्या कायदेशीर उत्पन्नातुन मिळवलेली एकूण मालमत्ता व त्यांच्या कुटुंबाचा उत्पन्न व खर्च याची तुलना करून चौकशी करण्यात आली. निरीक्षण कालावधीतील चौकशीत सन 2011 सालामध्ये खेडकर यांनी त्यांच्या एकुण उत्पन्नाचे 119 टक्के म्हणजे 12 लाख 5 हजार 445 रुपये इतकी जास्त मालमत्ता संपादित केली असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.
गैरमार्गाने संपत्ती जमविण्यासाठी खेडकर यांच्या पत्नी सविता खेडकर यांनी प्रोत्साहित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.