लोणावळा – लोणावळ्यातील मॅगी पॉईंट याठिकाणी अनेक सुशिक्षित होतकरू तरुण आणि त्याचे कुटुंबीय शांततेत व्यवसाय करीत आहे. या तरूणांच्या हातचे काम गेल्यास ते वाम मार्गालाही जाऊ शकतात, त्यामुळे कृपया त्यांच्या पोटावर मारू नका, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेश सचिव, माजी नगरसेवक निखळ कवीश्वर यांनी एमएसआरडीसी, आयआरबी, लोणावळा नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाला केली आहे. आयआरबीच्या अधिकारी याठिकाणी जाऊन गोरगरीबांवर दादागिरी करतात. तुम्ही दादागिरी कराल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मॅगी पॉईंटवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तेथील रहिवाशांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव, माजी नगरसेवक निखळ कवीश्वर, दीपा अतुल कुटे, वासीम शेख, अतुल कुटे, मयुरी कुटे, सविता येवले, संतोष थोरवे, मंगेश परदेशी, योगेश देशमुख, सुनील परब, प्राजक्ता येवले, चित्रा कामत आदी उपस्थित होते.
लोणावळा शहरातील पाच बंगला या परिसरात जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मॅगी पॉईंट याठिकाणी असलेल्या दुकानांवर तसेच टपऱ्यांवर एमएसआरडीसी, आयआरबी, लोणावळा नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनकडून कारवाई सुरू आहे. याठिकाणी या टपऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय केला जातो. मात्र त्यामुळे त्याठिकाणी अनेकदा भांडण, मारामाऱ्या, अपघात असे प्रकार घडत असल्याने हा भाग गुन्हेगारीचे केंद्र बनत चालल्याचे पोलीस खात्याचे म्हणणं आहे. येथील या वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी हा पॉईंट बंद करण्याच्या सूचना लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आईपीएस सत्यसाई कार्तिक यांनी एमएसआरडीसी, आयआरबी आणि लोणावळा नगरपरिषदेला लेखी स्वरूपात केल्या आहे.
पोलीस दलाच्या सुचनेमुळे मागील आठवड्यापासून आयआरबीची अतिक्रमण पथके मॅगी पॉईंट येथे सारखीच घिरट्या घालत आहे.
घरांवर हातोडा चालविण्याचा प्रयत्न
रस्त्यावर झालेले अतिक्रमण आम्ही काढून घेतले असतानाही ही पथक आमच्या राहत्या घरावर देखील हातोडा चालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मॅगी पॉईंट, पाच बंगला परिसरातील लोक करीत आहे. सर्व रस्ता रुंद करा, कारवाई देखील सरसकट करा, आम्ही रस्ता रुंदीकरणाला आम्ही सहकार्यच करू पण कृपया आम्हाला नाहक त्रास देऊ नका.