#लोकसभा2019 : मोदी यांच्याविरोधात आता फक्‍त 1 शेतकरी; 118 शेतकऱ्यांचे अर्ज अवैध

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या 119 शेतकऱ्यांपैकी फक्त एका उमेदवाराची उमेदवारी वैध ठऱली आहे.  निवडणूक आयोगाने अर्ज छाननीनंतर 118 शेतकऱ्यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यामुळे आता फक्त एक शेतकरी मोदींविरोधात रिंगणात आहे.

तेलंगणातील 119 शेतकऱ्यांनी विविध मागण्या मान्य न झाल्याने मोदींविरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व शेतकऱ्यांनी मोदींविरोधात वाराणसीतून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती; परंतु निवडणूक आयोगाच्या अर्ज छाननीदरम्यान उपयुक्‍त कागदपत्र आणि अटींची पूर्तता न केल्याने काही दिवसांपूर्वी 89 उमेदवारांचे अर्ज रद्द केले होते.
आता आणखी 24 शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता फक्‍त इस्तारी सुन्नम नरसईया हा एकमेव शेतकरी मोदींविरोधात निवडणूक रिंगणात आहे. याआधी लष्करातील बडतर्फ जवान तेजबहादूर यादव याचा अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला होता.

प्रतिज्ञापत्रांमध्ये दिलेल्या मजकुराबाबत स्पष्टीकरण न करू शकल्याने ही कारवाई करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर तेजबहादूर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वाराणसीमध्ये 19 मे रोजी सातव्या म्हणजेच अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या आठवड्यात मोठा रोड शो करून नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)