दिल्लीची दुसऱ्या स्थानासाठी धडपड; राजस्थानचा मोठ्या फरकाने करावा लागणार पराभव

कगिसो रबाडा मायदेशी परतला ; स्मिथ खेळण्याची शक्‍यता कमी

दिल्ली कॅपिटल्स Vs राजस्थान रॉयल्स

वेळ – दु. 4.00 वा.
स्थळ – फिरोज शाह कोटला मैदान, दिल्ली

नवी दिल्ली – तब्बल 7 वर्षांनी आयपीएलची बाद फेरी गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स समोर आज स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान असून बाद फेरीत दुसरे अथवा पहिले स्थान पटकावण्याच्या दृष्टीने दिल्लीचा संघ प्रयत्नशील असणार आहे. तर, विजय मिळवून प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी राजस्थानचा संघ प्रयत्नशील असणार आहे.

यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघासह प्रशिक्षक आणि व्यवस्थापनात अनेक बदल केले होते. ज्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला असून यंदा सात वर्षांनी दिल्लीच्या संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला असून या मोसमात आपल्या 13 सामन्यांमध्ये दिल्लीने आठ सामन्यात विजय मिळवला असून पाच सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सध्या दिल्लीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे 16 गुण झालेले आहेत. त्यातच विजयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या सामन्यात दिल्लीच्या संघाला धक्का बसला असून त्यांचा प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडा दुखापतीमुळे पुढचे सामने खेळू शकणार नसून आगामी विश्‍वचषक स्पर्धा लक्षात घेऊन रबाडा आपल्या मायदेशी रवाना झाला आहे. दिल्लीच्या संघाने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

कगिसो रबाडाला पाठीच्या दुखापतीमुळे चेन्नईविरुद्ध सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र विश्‍वचषकासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्याला मायदेशी बोलावले आहे. रबाडाने आतापर्यंत 12 सामन्यांत 25 बळी घेतले असून, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडा पहिल्या स्थानावर आहे. अशा महत्त्वाच्या प्रसंगी संघाला सोडून परतणे हे आपल्यासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचे रबाडाने यावेळी बोलताना सांगितले.

मात्र दिल्लीचा संघ विजेतेपद पटकावेल असा आत्मविश्‍वासही रबाडाने यावेळी बोलताना व्यक्त केला. रबाडाची उणीव आपल्या संघाला भासेल, मात्र आतापर्यंत करत आलेली कामगिरी पुढील सामन्यांमध्ये कायम ठेवण्याचा मानस मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटींग याने व्यक्त केला आहे.

तर, दुसरीकडे राजस्थानच्या संघाला यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करूनही ऐनवेळी झालेल्या चुकांमुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मोसमाच्या अखेरपर्यंत तळ्यात मळ्यात असणाऱ्या राजस्थान रॉयल्सची बाद फेरीची संधी फनी चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाने हिरावली गेली आणि राजस्थानचा संघ आता केवळ प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी मैदानात उतरलेला आहे. त्यामुळे किमाण स्पर्धेचा शेवट तरी गोड व्हावा यासाठी राजस्थानचा संघ प्रयत्नशील असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

राजस्थान रॉयल्स – स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एश्‍टॉन टर्नर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.