नवी दिल्ली – भारतीय संघाच्या कर्णधारपदी एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्मा याला कर्णधारपद देण्यात आल्याने संघातील उपकर्णधारपद रिक्त झाले आहे. याजागी लोकेश राहुलकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
राहुलसह यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहयांचीही नावे शर्यतीत आहेत. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर केला.
त्यावेळीच विराट कोहलीच्या जागी रोहितची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड केली. भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून त्यानंतर उभय संघांत तीन एकदिवसीय लढतीही खेळवण्यात येणार आहेत.