जानकर महायुती बरोबर गेल्याने भाजप विरोधी कार्यकर्त्यांना धक्का
अजय माळवे
Lok Sabha Election 2024 । माढ्यात भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधी उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार राहिलेले रासपचे महादेव जानकर यांनी महायुती बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप विरोधी कार्यकर्त्यांना जबरदस्त धक्का बसला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी धैर्यशील मोहिते-पाटील, संजीवराजे का ? अन्य कोण वाजविणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उमेदवारीविषयी मोठा आत्मविश्वास बाळगलेले भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे यांना डावलून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच पुनश्च संधी मिळाल्यामुळे मोहिते-पाटील आणि नाईक-निंबाळकर समर्थकांमध्ये तीव्र संताप उसळला होता. मात्र, मोहिते-पाटील कुटुंबीय कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत आणि पुढे पाहा या भूमिकेत असताना अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा संदर्भात बैठकीत महायुतीचा धर्म पाळावा, अशी सूचना विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना केली. परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारे नेते यांच्यांशी चर्चा करून मी निर्णय देईल असे सांगितले. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
मात्र, त्यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला राजे गटातील कार्यकर्त्यांनी विरोध करीत तुतारी हाती घ्या अशी मागणी जोरदारपणे केली होती.
मात्र रामराजे यांनी लवकरच उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडे शिष्टमंडळ नेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदला अन्यथा मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नसल्याचे सांगत उमेदवारी संजीवराजे ना द्या नाही तर आणखी कुणाला पण द्या मात्र रणजितसिंह यांची उमेदवारी बदला असे म्हणत चार दिवसांत निर्णय करणार असल्याचे सांगत रामराजे यांनी खासदार रणजितसिंह यांना आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले होते .
दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी वाजविण्यास सुरुवात केल्यामुळे मोहिते-पाटील यांच्या पुढील भूमिकेविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या माढा मतदारसंघात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. दरम्यान, खासदार निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात बेबनाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उभे राहण्याची जोरदार तयारी केली होती. खासदार निंबाळकर व मोहिते-पाटील यांच्यात सुरू झालेली रस्सीखेच चर्चेचा विषय ठरला असताना अखेर भाजपने खासदार निंबाळकर यांना पुनःश्च संधी दिली. त्यामुळे मोहिते-पाटील गटाला धक्का बसला आहे.
हे वाचले का ? मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा फायदा आम आदमी पक्षाला होणार का?
Lok Sabha Election 2024 । संजीवराजेंवर समर्थकांकडून वाढता दबाव
उमेदवारीविषयी मोठा आत्मविश्वास बाळगलेल्या मोहिते-पाटील आणि राजे गटात आता कमालीचे नैराश्य आणि संताप पसरला असून समाज माध्यमांवर मोहिते-पाटील आणि राजे गटाचे कार्यकर्ते समर्थक आक्रमक होऊन, माढा-निंबाळकरांना पाडा, असा धोशा लावला आहे. एवढेच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील मोहिते-पाटील हे माघार न घेता माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आव्हान देणारच, अशी गर्जनाही त्यांचे समर्थक करीत आहेत. तर संजीवराजे यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी वाजवावी, असा दबावही समर्थकांकडून वाढत आहे.
Lok Sabha Election 2024 । एक-दोन दिवसांत स्पष्ट होण्याची अपेक्षा
समाज माध्यमांवर तुतारी वाजविली जात असून सोबत शरद पवार आणि संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रतिमाही झळकावल्या जात आहेत. तथापि बैठकीत ४ दिवसांत निर्णय सांगतो असे रामराजे यांनी सांगितले असताना त्यांची भूमिका येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. शरद पवार गटाची तुतारी कोण वाजविणार याकङेच सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे वाचले का ? हटके प्रचार…! “मुलाच्या लग्नात ‘गिफ्ट’ आणू नका पण, मोदींना ‘मत’ द्या”लग्नपत्रिका ‘व्हायरल’