Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान जवळ आले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे या टप्प्यातील जागावाटप पूर्ण झाले. त्यात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट किंवा अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशाच लढती बहुतेक मतदारसंघात पाहायला मिळणार आहेत.
यामुळे भाजपने प्रादेशिक पक्षांना एकमेकांविरोधात भिडवून सुरक्षित जागांवरच लढण्याची खेळी खेळली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यातून समोर आलेले चित्र हे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी दिलासा देणारे आणि आश्वासक देखील आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या तीन टप्प्यात निम्म्या म्हणजेच 24 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यापैकी फक्त एका जागेवर भाजप विरुद्ध ठाकरे गटाच्या उमेदवारांची थेट लढत आहे. उर्वरीत 23 मतदारसंघात भाजपचे उमेदवार काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच दोन हात करताना दिसणार आहे.
भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात उमेदवार देणे टाळले असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी चार मतदार संघात, तर शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी एका ठिकाणी लढत होईल.
१) नागपूर – नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध विकास ठाकरे (काँग्रेस)
२) भंडारा गोंदिया – सुनिल मेंढे (भाजप) विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस)
३) गडचिरोली चिमूर – अशोक नेते (भाजप) विरुद्ध डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस)
४) चंद्रपूर – सुधीर मुनगुंटीवार (भाजप) विरुद्ध प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
५) रामटेक – शामसुंदर बर्वे (काँग्रेस) विरुद्ध राजू पारवे (शिवसेना शिंदे गट)
दुसऱ्या टप्प्यात एकही लढत नाही
दुसऱ्या टप्प्यात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी एकाही ठिकाणी लढत होताना दिसत नाही. शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्येच तीन ठिकाणी लढत होईल. तर या टप्प्यातही भाजप उमेदवारांची थेट लढत काँग्रेस आणि शरद पवार गटासोबतच असणार आहे.
त्यामुळे भाजप शिवसेना ठाकरे गटाविरोधात लढायला घाबरली आहे का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. । Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election