Lok Sabha Election 2024 । असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM ने महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी आणखी दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
पुण्यातून अनीस सुंडके आणि उस्मानाबाद (धाराशिव) सिद्दिकी इब्राहिम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातून महाविकास आघाडीच्या वतीने रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने तिकीट दिली आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.
आणखी दोन उमेदवारांच्या घोषणेसह, एआयएमआयएमने आता महाराष्ट्रातील एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहे. औरंगाबादचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पक्षाने पुन्हा एकदा तिकीट दिले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात पाच जागांवर मतदान झाले आहे.
ओवेसी यांनी महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही. मात्र, निवडणुकीत अकोल्यात प्रकाश आंबेडकर आणि अमरावतीत आनंद आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हा निर्णय जाहीर करताना ओवेसी म्हणाले होते की, हे दोन्ही नेते बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या कुटुंबातून आलेले आहेत, त्यामुळे पाठिंबा देऊ.
महाराष्ट्रात आता मतदान कधी?
दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण आठ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ-वाशीम आणि मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी यांचा समावेश आहे. भाजपचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक होत असून त्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये कोकणातील रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांचा समावेश आहे.
हे वाचले का ? ‘हिंदू देवी-देवतांच्या नावावर मते मागितली नाहीत’, म्हणत निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान मोदींना दिली क्लीन चिट