नवी दिल्ली – इंडिया आघाडीतील जागा वाटपाबाबत कॉंग्रेसमधील घडामोडी आधिक वेगवान झाल्या असून आज काँग्रेसच्या आघाडी समन्वय समितीची दुसरी बैठक मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी झाली. आज सकाळी पक्षाचे अनेक ज्येष्ठ सदस्य वासनिक यांच्या निवासस्थानी प्रवेश करताना दिसले. या समन्वय समितीची ही दुसरी बैठक आहे.
पहिली बैठक गेल्या आठवड्यात शनिवारी झाली होती. मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पाच जणांची समन्वय समिती नुकतीच स्थापन करण्यात आली आहे. या संबंधात वासनिक म्हणाले की आम्ही प्रथम आमच्या प्रदेश नेत्यांशी बोलू आणि लवकरच आम्ही जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करू. यासाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. पण आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे वासनिक यांनी उद्घाटन बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
या समितीत माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. इंडिया आघाडीत २८ पक्षांचा समावेश असल्याने जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चीत करण्यासाठी अनेक पातळ्यांवर चर्चा करावी लागणार आहे.