मुंबई – राज्यात लॉकडाऊन सुरू असतानाही आंतरराष्ट्रीय शाळांद्वारे मागण्यात येणारी फी व सरकारी यंत्रणांच्याद्वारे सुरू असलेले विविध करांची वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एका पत्राद्वारे केली आहे.
लोढा यांनी पत्रात नमुद केले आहे की, मुंबईमध्ये काही आंतरराष्ट्रीय शाळा आपल्या विद्यार्थ्यांची फीस भरण्यासंदर्भात पालकांना सांगत आहे. तसेच शाळा ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी दबाव आणत आहेत. यामुळे पालक अतिशय तणावात आहेत. याच प्रकारे महापालिका व काही अन्य सरकारी विभागांकडून वेगवेगळे कर वसुलीची सक्ती करत आहेत व त्यांना नोटीसही पाठवत आहेत.
या दोन महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भात राज्य सरकारने नोंद घ्यावी व फी वसूली तसेच सरकारी कराच्या मागणीला थांबवण्याचा आदेश जारी करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, करोनाविरोधात सुरू असलेल्या सरकारच्या उपाययोजनांबाबत लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत.