बंगलुरू – लोकांनी जाहीरपणे सार्वजनिक ठिकाणी शिंकावे आणि करोनाचा प्रसार करावा असे विक्षिप्त आवाहन फेसबुकवरून करणाऱ्या एका अभियंत्याला इन्फोसिस कंपनीने बडतर्फ केले आहे. मुजीब मोहंमद असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सुरुवातीला त्याच्या नावाने कोणीतरी ही खोटी पोस्ट टाकली असावी असा कंपनीचा कयास होता किंवा या कर्मचाऱ्याच्या नामसाधर्म्याचा हा दुसराच कोणीतरी हा इसम असावा अशी कंपनीला शक्यता वाटत होती; पण तपासाअंती आपल्याच एका कर्मचाऱ्याने
हे कृत्य केल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने त्याला तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे. आम्ही संपुर्ण चौकशी आणि खात्री करून घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे असे कंपनीने काल रात्री आपल्या ट्विटर अकौंटवरून नमूद केले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा आणि त्या अनुषंगाने कंपनीने ठरवून दिलेली आचारसंहिता पाळावी अशी सूचना आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना केली आहे. तथापि या कर्मचाऱ्याचे हे वृत्त कंपनीच्या सूचनेला धरून नव्हते त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या या इसमाला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे.