देशभरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन 5

इतर भागांत अनलॉक 1

नवी दिल्ली -करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील प्रतिबंधित क्षेत्रांमधील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांत आणखी महिनाभरासाठी लॉकडाऊन 5 लागू असेल.

मात्र, इतर भागांसाठी अनलॉक 1 अंतर्गत दिलासा देताना लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रतिबंधित नसलेल्या त्या भागांत 8 जूनपासून धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल आणि इतर आदरातिथ्य सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची मुदत उद्या (रविवार) समाप्त होत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी लॉकडाऊनबाबत नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली. प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरील भागांत आतापर्यंत मनाई करण्यात आलेल्या बाबी टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्याचे सूतोवाच गृह मंत्रालयाकडून करण्यात आले.

शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था, कोचिंग संस्था सुरू करण्याचा निर्णय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करून नंतर घेतला जाईल. शिक्षण क्षेत्राशी निगडीत संबंधित संस्था जुलैपासून सुरू करण्याबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पालकांशी आणि इतर संबंधितांशी सल्लामसलत करू शकतात, असे गृह मंत्रालयाने नमूद केले.

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो, चित्रपटगृह, जिम, स्विमिंग पुल, बार यांच्याबरोबरच राजकीय-सामाजिक-धार्मिक-सांस्कृतिम मेळावे, क्रीडा आणि मनोरंजनपर कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय स्थितीच्या आढाव्यानंतर घेतला जाईल. नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार रात्रीच्या संचारबंदीतील वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, देशभरात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.