बेकायदेशीर टेलिफोन एक्‍सेंज उदध्‌वस्त

मुंबई – इंटरनेटचा वापर करून चालवले जात असलेले एक बेकायदेशीर टेलिफोन एक्‍सेंज मुंबई आणि जम्मू काश्‍मीर पोलिसांनी आज उद्‌ध्वस्त केले. या प्रकरणी एका व्यक्‍तीला अटक केली आहे.

गोवंडीतून हे टेलिफोन एक्‍सचेंज चालवले जात होते. याविषयी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाल्यानंतर मुंबई आणि जम्मू काश्‍मीर पोलिसांनी संयुक्‍तपणे या टेलिफोन एक्‍स्चेंजवर छापा टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिथून काश्‍मीरमधल्या सुरक्षाविषयक यंत्रणांना फोन केले जात होते.

या जागेवरून भारतीय लष्कराची जम्मू काश्‍मीरमधील माहिती व सैन्यदलाच्या हालचालींविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी “व्हॉईसओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’चा गैरवापर केला जात होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या छाप्यात पोलीस आणि लष्कराच्या पथकाने बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी जप्त केल्या आहेत. 3 कार्यरत असलेली चिनी सिमकार्ड, याव्यतिरिक्‍त 191 सीमकार्ड, लॅपटॉप, मॉडेम, अँटीना, बॅटरी आणि कनेक्‍टर असा माल पथकाच्या हाती लागला आहे. याशिवाय “व्हीओआयपी’ तंत्रज्ञानाचा वापर करून आवाज बदलण्याच्या सुविधेचा गैरवापरही केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पाकिस्तानवरून आलेले कॉल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थानिक नंबरवर डायव्हर्ट करुन भारतीय लष्कराची गोपनिय माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. काही दिवसांपूर्वी काश्‍मीरमध्येही सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत झालेल्या या कारवाईला महत्व प्राप्त झालेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.