बारामती तालुक्यात स्थानिक नेत्याची हत्या; बारा झोपड्या पेटवल्या

डोर्लेवाडी (वार्ताहर) : बारामती तालुक्यातील सोनगाव येथील विद्यमान सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज थोरात यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. यानंतर संतप्त जमावाने एका विशिष्ट समाजाच्या दहा ते बारा झोपड्या पेटवून दिल्या. यामुळे बारामती तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज मकर संक्रांत असल्याने महिला सोनगाव येथील सोनेश्वर मंदिराच्या ठिकाणी पूजा करण्यासाठी येत होत्या. त्याठिकाणी आरोपी पनेश (पांग्या) आनंदा भोसले हा या महिलांची छेड काढत होता. युवराज थोरात हे त्यावेळी तेथे आले होते. त्यांनी भोसले याला महिलांची छेड काढू नको अशी समज दिली. दारूच्या नशेत असलेल्या भोसलेने थोरात यांच्याशी वाद घालत चाकूने छातीत वार केला त्यानंतर थोरात रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत भोसले पळून गेला. स्थानिकांनी तातडीने थोरात यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी थोरात यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच युवराज थोरात यांचा मृत्यू झाला. थोरात यांच्या शवविच्छेदनासाठी मृतदेह सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात नेण्यात आला. तोपर्यंत ही बातमी वेगाने पसरली. थोरात यांचे मित्र आणि सहकारी मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे तणावात भर पडली.

या घटनेमुळे संतप्त जमावाने सोनगाव येथील एका समाजाच्या वस्तीवर येऊन दहा ते बारा झोपड्या पेटवून दिल्या. या प्रकारची माहिती मिळताच बारामती तालुक्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.  बारामती तालुका पोलीस याबाबत तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.