वडगाव मावळ – वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आलेल्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खामशेत येथे 67 ग्रॅम 37 मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रोन अंमली पदार्थ व मोबाईल, वजनकाटा, रोख रक्कम, वाहने असे एकूण 6 लाख 68 हजार 100 रुपये किंमतीच्या मालासह मेफेड्रोन आदी मुद्देमाल जप्त केला. सोमवारी (दि. 4) ही कारवाई करण्यात आली.
शिवाजी मारुती कडू (वय 32, रा. कुरवंडे, ता. मावळ) व सोमनाथ वसंत बालगुडे (वय 30, रा. पाथरगाव, ता. मावळ) अंमली पदार्थ गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास कामी लोणावळा ते वडगाव मावळ असे पुणे-मुंबई महामार्गावर पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी खामशेत हद्दीत दर्शन मिसळ हाऊससमोर कामशेत बाजूकडे दिशेने उभी असलेली एक राखाडी रंगाची मोटार (एम. एच. 14 /जी. एच./1992 उभी होती. त्यात एक व्यक्ती होता व त्यासमोर एक काळे रंगाची मोटार सायकल (एम. एच. 14 /ई. जी/9318) उभी होती. या मोटारीमधील मोटारसायकल वरील व्यक्तींच्या हालचाली संशयित वाटत होत्या. सरकारी वाहन पाहून मोटार सायकलवरील व्यक्ती त्याची मोटारसायकल सुरू करून जात असताना मोटारसमोर घसरून पडल्याने मोटारही पुढे जाऊ शकले नाही.
पोलिसांनी दुचाकीवरील व्यक्ती व मोटारीमधील व्यक्तीला ताब्यात घेऊन नाव, पत्ता विचारले असता मोटारीमधील आरोपी शिवाजी कडू व दुचाकीवरील आरोपी सोमनाथ बालगुडे यांना येथे थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही, म्हणून सोमनाथ बालगुडे याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टच्या डाव्या खिशात एक प्लॅस्टिकचे पारदर्शक पिशवीत पांढरे रंगाची पावडर असलेल्या 15 पुड्या मिळून आल्या.
पॅन्टचे खिशात एक मोबाईल व रोख रक्कम मिळून आली, त्याबाबत सोमनाथ बालगुडे याच्याकडे विचारणा केली असता, या पुड्या मोटारीमधील व्यक्ती शिवाजी कडू यांचेकडून प्रत्येक पुडी 2000 प्रमाणे 30 हजार रुपये देऊन घेतली. या पुडीमध्ये मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ असल्याचे सांगितले.
याबाबत शिवाजी कडू याच्याकडे विचारले असता त्याने काही एक सांगितले नाही म्हणून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक मोबाईल व पॅन्टचे खिशात एक लहान इलेक्ट्रॉनिक वजन काटा मिळून आला. शिवाजी कडू याचे मोटारीमध्ये 52 ग्रॅम, 20 मिली ग्रॅम व सोमनाथ बालगुडे याचे अंगझडतीत 15 ग्रॅम 17 मिली ग्रॅम असे एकूण एक लाख 34 हजार 740 रुपये किंमतीची 67 ग्रॅम 37 मिली वजनाची मेफेड्रोन अंतरराष्ट्रीय बाजार किंमत 2000 प्रती ग्रॅम प्रमाणे व 5 लाख 33 हजार 360 रुपये किंमतीची मोटार, दुचाकी, वजनकाटा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 6 लाख 68 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कामशेत पोलीस ठाण्यामध्ये गुरनं 2/2021, गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क) 21 (क) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, विजय पाटील, दत्तात्रय जगताप, शब्बीर पठाण, विद्याधर निचित, प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, सुनील वाणी, सचिन गायकवाड, सागर चंद्रशेखर, गुरू जाधव, अक्षय जावळे, बाळासाहेब खडके यांनी केली आहे.