मुंबई -भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात 18 जून रोजी इंग्लंडमध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत होणार आहे. हा सामना इंग्लंडला होत असून, भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज हिटमॅन रोहित शर्मा याच्यासाठी ही कसोटी व त्यानंतरची इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका लिटमस टेस्ट ठरणार आहे.
रोहित हा मर्यादित षटकातील सर्वात आक्रमक फलंदाज आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये मात्र रोहित संघर्ष करताना दिसतोय. 34 वर्षीय रोहित कसोटी संघात सलामीवीर म्हणून जागा कायमस्वरूपी निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे.
रोहितसाठी पुढील काही महिने अतिशय आव्हानात्मक व महत्त्वाचे आहेत. कसोटी अजिंक्यपद
स्पर्धेच्या सामन्यासह इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मोठ्या दौऱ्यासाठी रोहितची फलंदाजी सातत्यपूर्ण होणे भारतीय संघासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
रोहित 2014 सालानंतर प्रथमच इंग्लंड दौऱ्यावर कसोटी खेळणार आहे. तेव्हा तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. 2014 सालच्या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीत रोहितचा संघात समावेश केला होता आणि रोहितने 34 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात 28, तर दुसऱ्या डावात केवळ 6 धावा केल्या होत्या.
त्यानंतर 2019 सालापासून रोहित कसोटीत सलामीवीर म्हणून खेळत आहे आणि त्याची कामगिरी चांगली होत आहे. रोहितने अनेक सामन्यात चांगली सुरुवात केली आहे. पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला आहे. रोहितने ऑस्ट्रेलियात सातत्यपूर्ण फलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियातील वेगवान गोलंदाजांचा त्याने चांगला सामना केला.
पण अनेक डावात त्याने स्थिरावल्यानंतरही आपली विकेट स्वस्तात गमावली असल्याने आता आगामी काळातील या कसोटी सामन्यांसाठी त्याला शॉट सिलेक्शन व संयमावर भर द्यावा लागणार आहे. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होतो. रोहितला चेंडूच्या दर्जानुसार खेळावे लागेल.
अन्य देशांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये रोहितला अडचणी येऊ शकतात. तेथे चेंडू स्विंग होतो आणि स्विंग चेंडू खेळण्यासाठी फलंदाजाला अधिक संयमी राहावे लागते. त्यामुळे रोहितच्या यशावरच भारतीय संघाचेही वर्चस्व अवलंबून राहणार आहे.
आक्रमकतेला वेसण घालावी लागणार
रोहित शर्मा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, न्यूझीलंडविरुद्धची कसोटी तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संयम ठेवत खेळ करावा लागेल. इंग्लंडमधील वातावरण वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असते, त्यामुळे त्याला आक्रमकतेपेक्षा तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल.