टोकियो -टोकियो ऑलिम्पिकला आता दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असला तरीही स्पर्धेबाबतच्या अडचणींत सातत्याने भर पडत आहे. अमेरिकेसह अनेक देशांच्या खेळाडूंनीच नव्हे तर त्यांच्या देशांच्या ऑलिम्पिक संघटनांनीही टोकाचा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.
तसेच जपानमध्ये स्पर्धेतील विविध प्रकारांमध्ये सहभागी होण्याची तयारी असली तरीही प्रवास करण्याची तयारी मात्र दाखवलेली नाही.
आता या स्पर्धेतील सर्वच प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक शहरात जाताना विमान प्रवास करणे शक्य नसल्याने अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यासह काही देश या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे.
जपानमध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी जपानमध्ये प्रवास करू नये, असा इशारा अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तसेच राज्य विभागानेही दिला आहे. जपानमधील प्रवासाबाबत इशारा देण्यात आला असला तरी अमेरिकेने जपानमध्ये जाण्यास नागरिकांवर बंदी घातलेली नाही.
मात्र, लसीकरणानंतरही जपानमध्ये करोनाची बाधा होण्याची शक्यता जास्त असल्याने जपानमध्ये जाताना प्रवास कसा करायचा याचाही विचार करण्याचे आवाहन अमेरिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
ऑलिम्पिकसाठी अमेरिकेसह विविध देशांचे खेळाडू रवाना होण्यापूर्वी आणि जपानमध्ये दाखल झाल्यानंतर तसेच स्पर्धेदरम्यानही खेळाडू तसेच प्रशिक्षकांच्या करोना चाचण्या करण्यात येतील.
ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याबाबत दबाव वाढू लागल्यामुळे जपान सरकारने टोकियो व ओसाका या दोन प्रमुख शहरांमध्ये लसीकरण करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असे जपान सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.