पिफ २०२० : डाऊन सिंड्रोम असलेल्या विशेष मुलांवरील ‘लिझाज टेल’

डाऊन सिंड्रोम असलेल्या विशेष मुलांवरील ‘लिझाज टेल’ हा चित्रपट आहे. अशा मुलांसाठी हे जग योग्य नाही अशी दिग्दर्शकाची भावना असून या जगात त्यांना आनंद, प्रकाश मिळू शकेल का? याचा शोध घेणारा हा चित्रपट आहे.

हा चित्रपट युक्रेनच असून दिग्दर्शकाने मानवी भावना यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शक अलेक्झांडर झहोव्ना हे स्वतः डाऊन सिंड्रोम असलेल्या विशेष मुलांच्या ४ शाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून गेली ३० वर्षे काम करतात, त्यामुळे त्यांच्या अनुभवावर आधारित एक कादंबरी त्यांनी लिहिली असून त्या कादंबरीवरून सत्य कथेवर आधारित हा चित्रपट असल्याचे काल्मिको यांनी सांगितले.

ते म्हणाले, “अलेक्झांडर कोणीही प्रशिक्षित दिग्दर्शक नाही. मात्र त्यांच्या कार्यकाळात मानत साठलेल्या भावनांचा सर्जनशील निचरा या चित्रपटात झाला आहे. या विशेष मुलांविषयी समाजात फारशी जागरुकता नाही. म्हणून या मुलांचे जग चित्रपटाच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे. ज्या मुलांचे पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते आपल्या मुलांना बऱ्याच गोष्टी शिकवून त्यांच्या आयुष्याला वेगळेवळण देण्याचा प्रयत्न करतात मात्र ज्या मुलांना असा आधार नाही त्यांचे आयुष्य असेच या शाळांमध्ये निघून जाते.”

“चित्रपट अभिनयासाठी व्यावसायिक कलाकार घ्यायचे ठरवले होते. तसे मिळालेही परंतु नंतर काही अडचणी आल्या. म्हणून मग याच मुलांमधून निरीक्षण करून काही मुले निवडली व त्यांनी उत्तम साथ देत अभिनय केला.” असेही काल्मिको यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.