दोहा – अर्जेंटिनाला विजेतेपद मिळवून दिल्यावर आधी जाहीर केल्याप्रमाणे लिओनेल मेस्सी निवृत्त होणार होता. मात्र, त्याने विजेतेपद साकार झाल्यावर बोलताना आपण यापुढेही खेळत राहणार असून इतक्यात निवृत्ती घेणार नाही, (Lionel Messi won’t retire from Argentina after World Cup win) असे सांगत यू-टर्न घेतला. त्याच्या या मतावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून एकीकडे त्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे त्याने घेतलेल्या यू-टर्नमुळे टीकाही सुरू झाली आहे.
या स्पर्धेला प्रारंभ झाल्यावर मेस्सीनेच आपल्या निवृत्तीचे संकेत दिले होते. संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवल्यावर हाच आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल, असेही मेस्सी म्हणाला होता. मात्र, प्रत्यक्षात संघाने विजेतेपद पटकावल्यावर मेस्सीनेही आपण निवृत्ती घेणार नसल्याचे जाहीर केले.
एक खेळाडू म्हणून माझी अद्याप काही वर्षे कारकीर्द वाढू शकते. विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाले असले तरीही इतक्यात निवृत्तीचा कोणताही विचार नसून यापुढेही खेळतच राहणार आहे, असे मेस्सीने सांगितले.
#FIFA : 2026 साली होणाऱ्या ‘FIFA World Cup’ स्पर्धेबाबत फिफाची मोठी घोषणा
अर्जेंटिनाकडून यापुढेही खेळत राहण्याचे ठरवले आहे. तसेच संघाला येत्या काळात होत असलेल्या विविध स्पर्धांमध्येही यश मिळून देण्यासाठी सज्ज आहे. देशाकडून खेळताना अभिमान वाटतो व माझी तंदुरुस्तीही शंभर टक्के असल्याने निवृत्ती घेण्याचा प्रश्नच येत नाही, असेही मेस्सीने सांगितले.