किव्ह – अर्जेंटिनाचे नवीन अध्यक्ष जेवियर माइले यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये दाखल झाले. झेलेन्सकी यांची अर्जेंटिनाला ही पहिलीच भेट आहे. रशिया आणि युक्रनेमधील युद्ध सुरू झाल्याला आता २१ महिने होऊन गेले आहेत आणि झेलेन्सकी आता मदतीसाठी श्रीमंत देशांच्या मदतीची अपेक्षा करत आहेत.
शपथविधीच्या सोहळ्यानंतर माइले यांनी अध्यक्षांच्या राजवाड्यामध्ये झेलेन्सकी यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी दीर्घ चर्चा केली. माइले यांनी पूर्वी ज्यू धर्म स्विकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. झेलेन्सकी यांना माइले यांनी ज्यू धर्मियांची मेणबत्त्यांची मांडणी भेट दिली. अर्जेंटिनाच्या अर्थकारणाला रुळावर आणण्याचे आपले मुख्य काम असल्याचे माइले यांनी शपथविधी पूर्वी म्हटले होते.
त्यांचे परराष्ट्र धोरण हे पाश्चात्य प्रेमी आहे. त्यांनी रशिया आणि चीन या दोन्ही देशांवर अविश्वास देखील व्यक्त केला होता. युक्रेनला पाठिंबा दिल्याबद्दल झेलेन्सकी यांनी फोन करून माइले यांना यापूर्वीच धन्यवाद दिले आहेत. युक्रेनला पाठिंबा मिळवण्यासाठी झेलेन्की यांनी पूर्वी आफ्रिका आणि आशिया खंडातील देशांनाही भेटी दिल्या आहेत. युरोपातील देशांनी युक्रेनला पहिल्यापासूनच पाठिंबा दिला आहे.