सातारा – राजकीयदृष्या संवेदनशील असलेला नागठाणे आणि कोडोली गण अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांचा पत्ता कट झाला आहे. लिंब, शेंद्रे, अतित, खेड हे गण सर्वसाधारण जागेसाठी राखीव झाल्याने या गणात तुल्यबळ लढती होणार आहेत. सातारा पंचायत समितीची आरक्षण सोडतीत सात जागा खुला प्रवर्ग, सात जागा सर्वसाधारण महिला, ओबीसीसाठी चार तर दोन जागेवर अनुसूचित जातीच्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे.
प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार आशा होळकर, निवासी नायब तहसिलदार सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत सातारा पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी ओबीसी महिला, अनुसुचित जातीच्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण विद्यार्थ्यांकडून चिठ्ठ्या काढत जाहीर करण्यात आले.
सातारा पंचायत समितीत एकूण वीस गण आहेत. तालुक्यातील गणांमधील विविध प्रवर्गांची लोकसंख्या विचारात घेऊन 50 टक्क्यांहून अधिक ज्या प्रवर्गाची लोकसंख्या असेल त्या प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले. सातारा पंचायत समितीसाठी दोन जूनला प्रारुप रचना तर 27 जूनला अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द झाली होती. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार आज पंचायत समितीच्या सर्वसाधारण 14 जागा, ओबीसी चार तर अनुसूचित जातीसाठी दोन जागांवर आरक्षण सोडत झाली.
यामध्ये ओबीसी आरक्षण जाहीर झालेल्या गणांमध्ये महिला व पुरुषांचे आरक्षण काढण्यासाठी मागील तीन पंचवार्षिक आरक्षणांचा क्रम प्राधान्याने ठरविण्यात आला होता. त्यानुसार ओबीसी आरक्षण गणांमधील आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जागेवर नागठाणे गणात महिला तर कोडोली गणात खुल्या जागेवर आरक्षण पडले आहे. या आरक्षणाने अनेक दिग्गजांना फटका असला असून जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समितीतही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
असे आहे आरक्षण
सर्वसाधारण : लिंब, खेड,अंबवडे बु.,कारी, पाडळी, शेंद्रे, अतीत. सर्वसाधारण महिला: पानमळेवाडी, शिवथर,पाटखळ,संभाजीनगर,देगाव, वर्णे, अपशिंगे ओबीसी: वनवासवाडी(महिला), अंगापूर वंदन(महिला),जकातवाडी (खुला),कोंडवे(खुला)अनुसूचित जाती : नागठाणे (महिला) कोडोली(खुला)