प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 – सणस मैदानावरील सिंथेटिक ट्रॅक खराब झाल्याने महापालिकेने ऍथलेटिक्स खेळाडूंना सरावासाठी हे मैदान बंद केले असताना, ढोल-ताशा पथकांना मात्र येथे सरावासाठी परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे या पथकांसाठी पायघड्या घालणाऱ्या महापालिकेने या मैदानावर सराव करणाऱ्या भावी अग्निवीरांना “हाल गड्या’ म्हणत बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडूनही तोंडावर बोट ठेवले जात आहे.
सध्या या मैदानात ढोल-ताशा पथकांचा ट्रॅकच्या मध्यभागी सराव सुरू आहे. या पथकासाठी पालिकेने अग्निवीर भरतीसाठी सराव करण्यासाठी येत असलेल्या युवकांना बंदी घातली आहे. महापालिकेने या मैदानात 2006 मध्ये सिंथेटिक ट्रॅक उभारला होता. हा ट्रॅक जवळपास 20 ते 25 वर्षे टिकणे अपेक्षित असतानाच या ट्रॅकवर होणारे राजकीय कार्यक्रम, पोलीस भरती आणि लष्कर भरतीच्या संस्थांचे प्रशिक्षण कार्यक्रम, ढोल पथकांचा सराव अशा कारणामुळे हा ट्रॅक खराब झाला.
याशिवाय आसपासच्या परिसरातील नागरिकही या मैदानात सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी येत होते. तसेच मुक्त खेळाडूही सरावासाठी येत असल्याने हा ट्रॅक खराब झाला. याशिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने मुलींची छेडछाड, चोऱ्यांची संख्याही वाढली. परिणामी पालिकेच्या क्रीडा विभागाने या मैदानात जवळपास सर्वांना मनाई केली. महापालिकेचे दैनंदिन पास घेऊन अग्निवीरमध्ये समाविष्ट होण्यासाठी सराव करत असलेल्या अनेक युवकांनाही मैदातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. मात्र, त्याच वेळी या मैदानात काही ढोल-ताशा पथकांना वादनासाठी पालिकेने परवानगी देत त्यांना मैदान खुले केले आहे. परिणामी, ढोल ताशासाठी मैदान चालते मग आम्हाला सरावासाठी का नाही, असा सवाल युवकांकडून उपस्थित केला जात आहे.
मी पुणे जिल्ह्यातील एका गावातून पुण्यात “एमपीएससी’ तयारीसाठी आलो आहे. त्यासोबतच मी अग्निवीरच्या प्रवेशासाठी तयारी करत आहे. त्यामुळे मी रोज या मैदानावर सरावासाठी पास घेऊन जात होतो. मात्र, आता आम्हाला आत जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
– अग्निवीरसाठी सराव करणारा युवक
मैदानाचा गैरवापर वाढल्याने प्रवेशावर मर्यादा आणल्या आहेत. वापरासाठी पालिकेकडून नियमावली केली जात असून, त्यानंतर सरावासाठी कोणाला परवानगी द्यायची अथवा नाही याचे निर्णय घेतले जातील.
– संतोष वारुळे, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका