मलोट (श्री मुक्तसर साहिब, पंजाब): सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च काळजी घेऊन सर्व अत्याधुनिक यंत्रणा असलेले सुप्रसिद्ध टायटॅनिक हे प्रवासी जहाज पहिल्याच प्रवासात 1912 साली हिमनगाला धडकून त्याचे तुकडे झाले आणि ते बुडाले. या दुर्घटनेत 1500 जणांचा बुडून मृत्यू झाला.
आता त्या घटनेला 110 वर्षे उलटून गेलेली असतानाच या जहाजाच्या भव्य मॉडेलचीही पाऊस आणि जोरदार वादळामुळे तशीच स्थिती झाली आहे. पंजाबमधील मलोट (श्री मुक्तसर साहिब) येथील व्यापार यात्रेत उभारलेल्या या देखण्या आणि भव्य मॉडेलची दुदर्शा झाली. अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काढली.
मलोट येथील भाजीबाजाराच्या मैदानावर सध्या ट्रेड फेअरला येणाऱ्या लोकांच्या आकर्षणासाठी याठिकाणी टायटॅनिक जहाजाची भव्य प्रतिकृती बनवण्यात आली होती. नुकत्याच आलेल्या मुसळधार, वादळी पावसामुळे ही प्रतिकृती कोसळली. सुमारे शंभर फूट लांब आणि 35 फूट रुंद अशी ही प्रतिकृती, लाकूड, बांबू, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून उभारण्यात आली होती. ही प्रतिकृती अनेक वर्षे टिकेल अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्याच पावसात तिचे तुकडे झाले.
मूळचे टायटॅनिक हे जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाज होते. 10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साऊथम्पटन येथून पहिल्याच समुद्र सफारीला निघाले होते. लेकिन त्याच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. 14 एप्रिल 1912 रोजी ते एका हिमनगाला धडकून बुडाले.