“पेट्रोल, डिझेलच्या किंमतींप्रमाणे तुम्ही…”; खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून अमित शहांना हटके शुभेच्छा; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री आमो भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा आज ५७  वा वाढदिवस आहे.  या निमित्ताने देशातील दिग्गज नेते आणि भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून अमित शहांचे अभिनंदन करण्यात येत आहेत. अमित शाह यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील गृहमंत्री अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत.पण त्यांच्या शुभेच्छा सध्या चांगल्याच चर्चेत येत असल्याचे दिसत आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडिओ ट्वीट केले  आहे. हे ट्वीट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलेला हा व्हिडिओ हिंदी भाषेत आहे. त्याद्वारे त्यांनी अमित शाह यांना उपरोधिक शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“माननीय केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत अमितभाई शहा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पेट्रोल, डिझेलच्या किंमतींप्रमाणे तुम्ही तुमचे वयाचे शतक पूर्ण करा. ज्याप्रमाणे खाद्यतेलांच्या किमती सतत वाढत आहेत, त्याचप्रमाणे तुमच्या कर्तव्याचा आलेखही वाढला पाहिजे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

“ज्याप्रमाणे गॅस सिलेंडरची किंमत दुप्पट झाली आहे, त्याचप्रमाणे तुमचे यशही दुप्पट झाले पाहिजे. सर्वसामान्य जनतेला महागाईच्या प्रभावापासून वाचवण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती मिळावी यासाठी मी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!,” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

या ट्विटमध्ये शुभेच्छा देणाऱ्या व्हिडीओसह देशभरातील माधम्यांना टॅग केले आहे. खासदार अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. खासदार म्हणून निवडून गेल्यापासून संसदेत अमोल कोल्हे यांनी केलेली अनेक भाषणे केली आहेत.

दरम्यान, शुक्रवारी पुन्हा एकदा देशात इंधन तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आज पुन्हा तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर ३५-३५ पैशांनी वाढवले ​​आहेत. त्यानंतर अमित शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा देशातील इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.