मुंबई -आम्ही लढणारे आहोत. लढत राहू. वेळ आल्यावर बहुमत सिद्ध करून दाखवू. सत्याचाच विजय होईल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी रात्री व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी बंडाचे निशाण फडकावणारे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र, त्या राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना फेटाळून लावल्या.
पवार यांनी कुठलाही सल्ला दिला नाही. ठाकरेच मुख्यमंत्रिपदी राहतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्यामुळे महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची शिंदे यांची प्रमुख मागणी शिवसेनेला मान्य नसल्याचे सूचित होत आहे.