लंडन – सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच व स्पेनचा राफेल नदाल यांना पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या मानाच्या विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी अनुक्रमे पहिले व दुसरे मानांकिन देण्यात आले आहे. मात्र, जीने स्पर्धेत आजवर वर्चस्व राखले त्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला मात्र मानांकन देण्यात आले नसून ती चक्क बिगरमानांकित खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या नदालने विजेतेपद पटकावले होते त्यामुळे विम्बल्डन स्पर्धेतही तोच संभाव्य विजेता मानला जात आहे.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंग्लंड क्लबने रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घातल्यामुळे डॅनियल मेदवेदेव सहभागी होणार नसून अलेक्झांडर ज्वेरेवने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. महिलांमध्ये 23 वेळा ग्रॅंडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स बिगरमानांकित खेळाडू म्हणून उतरणार आहे. विम्बल्डनच्या गेल्या मोसमात पहिल्या फेरीच्या सामन्यातून माघार घ्यावी लागल्यानंतर सेरेनाने स्पर्धात्मक टेनिसमध्ये सहभाग नोंदवलेला नाही.
ऑल इंग्लंड क्लबने सेरेनाला स्पर्धेत थेट प्रवेश दिला असला तरीही इतक्या मोठ्या खेळाडूला नामांकनही देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महिलांच्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या पोलंडच्या इगा स्वेटेकला या स्पर्धेतही अग्रमानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीला सोमवारपासून सुरुवात होईल. दरम्यान, भारताचा रामकुमार रामनाथन आणि युकी भांब्री विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पात्रतेचा निकष पूर्ण करू शकले नाही व पहिल्याच पात्रता फेरीत पराभूत झाले.