वॉशिंग्टन – चीन कडून जी जी आव्हाने आमच्या समोर उभी केली जातील त्याच्याशी आम्ही थेट दोन हात करू अशी स्पष्ट भूमिका अमेरिकेचे नवीन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्यक्त केली आहे. तथापि ज्या बाबींमध्ये अमेरिकेचे हित आहे त्या बाबतत चीनबरोबर काम करण्यास आम्ही जराही कचरणार नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या समोर बोलताना बायडेन म्हणाले की, चीनच्या आर्थिक आक्रमक धोरणाला आम्ही समर्थपणे विरोध करू, त्यांनी मानवाधिकारांचे हनन केले तर आम्ही त्याच्या विरोधात उभे ठाकू, जागतिक पातळीवर त्यांनी जर प्रशासनीक हस्तक्षेप केला तर आम्ही तो मोडून काढू.
पण जर एखाद्या बाबतीत चीनच्या बरोबर काम करण्याने अमेरिकेचे हित जपले जाणार असेल तर आम्ही त्यांच्याशी सहकार्यानेही काम करण्यास जराही कचरणार नाही असेही त्यांनी यावेळी निक्षुन सांगितले.
चीनच्या संबंधात नव्या सरकारचे धोरण काय असेल यावर बायडेन यांनी प्रथमच हे भाष्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा सक्रिय होत असून आम्ही आमच्या नेतृत्वाची पोझीशन पुन्हा प्राप्त करू आणि आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जागतिक कृतीला प्रोत्साहन देऊ असेही त्यांनी सांगितले.
तत्पुर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुव्हिलियन यांनी सांगितले की, चीनच्या ज्या आर्थिक धोरणामुळे अमेरिकन नागरीकांच्या हिताला बाधा येते, ज्या धोरणामुळे अमेरिकन नागरीकांच्या नोकऱ्या गमावल्या जातात त्याच्याशी दोन हात करण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत.