पुणे – पुणे महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना ‘गुड टच, बॅड टच’ ची माहिती व्हिडीओ फिल्मच्या माध्यमातून देण्यात आली.
पुण्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून व पुणे महापालिका प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्श ज्ञानाबद्दल माहिती देवून चांगला व वाईट स्पर्श म्हणजे नेमका काय? कोणत्या व्यक्तीने केलेला स्पर्श हा चांगला किंवा वाईट संबोधला जाईल ? याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्श ज्ञानाविषयी जागृती होवून समोरील व्यक्तीच्या वर्तनाविषयी अवलोकन करण्याबाबत ज्ञानात भर पडली.
विविध पध्दतीच्या सर्व बाबींची कडक अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्याबाबतची माहिती महापालिकेच्या ढोले पाटील रोड विभागाचे शिक्षण विभागातील सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी दिली
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शाळा भरताना व सुटताना अशी दोन वेळेस उपस्थिती घेतली जाणार असून अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनव्दारे संपर्क साधून विद्यार्थ्याविषयी माहिती घेतली जाणार आहे. शाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची शालेय रखवालदारांच्या मार्फत कडक चौकशी केली जाणार असून शाळेत प्रवेशासाठी रजिस्टर ठेवले जाणार आहे.
अनोळखी व्यक्तीला शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. तसेच शिक्षकांच्या लेखी परवानगी शिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांना शालेय वेळेत विना परवानगी शाळेच्या बाहेर पडता येणार नाही. या विविध सूचनांची अंमलबजावणी शाळांना करावीच लागणार आहे, असेही जयेश शेंडकर यांनी स्पष्ट केले आहे.