मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नुकतीच यादी जाहीर केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही अखेर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून उमेदवारांची माहिती दिली. त्याचबरोबर दोन्ही उमेवादारांच्या विजयाबद्दल विश्वासही व्यक्त केला.
श्री. शशिकांत शिंदे, सातारा व श्री. अमोल मिटकरी, अकोला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे.@shindespeaks @amolmitkari22
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 10, 2020
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत असून, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. “शशिकांत शिंदे (सातारा) व अमोल मिटकरी (अकोला) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे,” असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यात्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने त्यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यपालांकडून त्यास नकार आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक घेण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने मागणी मंजूर करत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.