मुंबई : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात कोणताही चमत्कार झालेला पाहायला मिळाला नसून भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवला आहे. मात्र त्यांनी आपल्या विजयात काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला आसल्याचे दिसून येत आहे. बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांनी काही महाविकास आघाडीचीही मते मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले. महाविकास आघाडीची जवळपास 16 मते फुटली असल्याचे समोर आले.
राज्याचे लक्ष नागपूरच्या निकालावर लागले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली होती. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. बावनकुळे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजपात धुसफूस सुरू झाली होती.
भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. मात्र, मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला.