पुणे – राखीव पोलीस दलासाठी (एसआरपीएफ) रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. यात कोथरूड येथे मोबाइलद्वारे प्रश्नपत्रिकेची कॉपी करणाऱ्या उमेदवाराला पोलिसांनी अटक केली. तर, हडपसरमध्ये एका उमेदवाराच्या जागेवर त्याचा भाऊ परीक्षा देत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यास अटक करून त्याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मोबाइलद्वारे कॉपी
कोथरूड पोलिसांनी केतन विठ्ठल लखवाड, (वय 24, रा. मंबापूरवाडी, खुलताबाद, औरंगाबाद) याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरराव मोरे विद्यालयात रविवारी “एसआरपीएफ’ जामखेड ग्रुपसाठी लेखी परीक्षा होती. परीक्षा दुपारी सुरू झाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास उमेदवारांना प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या. त्यावेळी केतन हा त्याच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढत होता. तसेच कॉपी करत होता. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्यास तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तो परीक्षेचा पेपर कॉपी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली.
उमेदवाराऐवजी परीक्षा देणारा भाऊ सापडला
हडपसर येथील घटनेप्रकरणी विशाल गबरुसिंग बहुरे
(रा. जोडवाडी, औरंगाबाद) यास अटक केली असून, त्याच्यासह आणखी एकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनुप पवार (वय 42, रा. सासवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पर्यवेक्षक आहेत. “एसआरपीएफ’ची हडपसरमधील एस.एम.जोशी महाविद्यालयात रविवारी परीक्षा सुरू होती. त्यावेळी ते उमेदवारांचे प्रवेशपत्र तपासत होते. तेव्हा, बहुरे हा त्याच्या भावाच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी आल्याचे आढळले. त्याने परीक्षेत कॉपी करण्यासाठी आणलेल्या दोन इलेक्ट्रॉनिक वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर त्यास हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.