लोकसभेतून विधानसभेसाठी ‘मत’पेरणी

“युती’ धर्मावर ठरणार गणिते : कोथरूडमधून मोठे मताधिक्‍य

पुणे – विधानसभा मतदारसंघनिहाय मतांमधून भाजपचे वर्चस्व जाणवले. मात्र, काही ठिकाणी मताधिक्‍य कमी झाले परंतु भाजपचे बालेकिल्ले असलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजपने चांगलीच आघाडी घेतली. तर, दुसऱ्या बाजूला गिरीश बापट यांना अगदी तोंडपाठ असलेल्या कसबा मतदारसंघातून मिळालेले मताधिक्‍य हे चौथ्या क्रमांकावरचे आहे. तर कॅन्टोन्मेंटसारख्या कॉस्मोपॉलिटियन मतदारसंघानेही गेल्यावेळीपेक्षा चौपट मत”दान’ भाजपच्या झोळीत टाकले आहे. तर, वडगावशेरीसारख्या भागानेही बापटांना चांगली साथ दिली आहे. त्यामुळे मतदारसंघनिहाय विश्‍लेषण हे आगामी विधानसभा निवडणुकीचा गृहपाठच म्हणावा लागेल.

कोथरूडवर दावेदारी कोणाची?

भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात यंदाही भाजप-शिवसेनेचीच सरशी राहिली आहे. या मतदारसंघाने बापट यांना सर्वाधिक म्हणजे एक लाख 48 हजार 570 मताधिक्‍य मिळवून दिले आहे. हे मताधिक्‍य खुद्द बापट यांच्या असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघापेक्षा जास्त आहे. हे मताधिक्‍य विधानसभेसाठीही अबाधित राहिले तर हा किल्ला भाजपकडेच राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विधानसभेच्या या जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये नक्कीच चढाओढ राहणार, हे निश्‍चित समजले जात आहे.

कोथरूड आणि शिवाजीनगर मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतर कोथरूड मतदार संघ हा पूर्वी शिवसेनेला गेला. त्यानंतर युती तुटली आणि तेथून भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी विजयी झाल्या. एवढेच नव्हे, तर महापालिका निवडणुकांतही या मतदारसंघातून चांगले मताधिक्‍य मिळाले. या मतदारसंघातून बापट यांना एक लाखांच्यावर मताधिक्‍य देणार असल्याचे मेधा कुलकर्णी यांनी जाहीर केले आणि शिवसेनेचीही जोड त्याला मिळाली त्यामुळेच दीड लाखांच्या जवळपास मते बापट यांना मिळाली.

पेठांमधील बहुतांश पेठकरी हे कोथरूड भागात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या भागाला “मिनी नारायण’, “सदाशिव’, “शनिवारपेठ’च म्हणावे लागेल. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारसरणीचा प्रभाव याठिकाणी जास्त आहे. त्याचाही फायदा मताधिक्‍य वाढवण्यात झाला आहे.

ही सगळी अनुकूलता असल्याने शिवसेना पुन्हा एकदा हा मतदारसंघ युतीधर्मातून विधानसभेसाठी मागणार हे जवळपास निश्‍चित झाला आहे. परंतु शिवसेनेच्याच उमेदवाराला हरवून भाजपच्या मेधा कुलकर्णी याठिकाणाहून निवडून आल्याने त्यांचा दावा या जागेवर जास्त आहे. या सगळ्या प्रक्रियेला आता तीनच महिने राहिल्याने या हालचालींना आता वेग येणार हे देखील निश्‍चित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.