अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल होणार?

नगरसेवक योगीराज गाडे ः कचऱ्याचे ढीग पडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

नगर – शहरात दैनंदिन साफसफाई होत नाही. कचरा कुंड्यांमधील कचरा उचलला जात नाही. शहरातील अनेक भागामध्ये कचरा जागेवरच जाळला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. शहरातील उपनगर भागात घंटा गाड्यांद्वारे कचरा संकलन नियमित केले जात नाही. याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली असता, अपुरी कर्मचारी संख्या, सक्षम नसलेली यंत्रणा यामुळे अडचणी येत असल्याचे सांगण्यात येते.

याबाबत मनपा प्रशासनालाही अवगत केलेले आहे. तरीदेखील अडचणींची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही, प्रशासनाच्या या आडमुठया व उदासीन धोरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. जनतेच्या प्रश्‍नांसंदर्भात आम्ही आंदोलने केली तर आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. मात्र मनपाचे अधिकारी कर्मचारी काम करत नसतील तर त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल होणार? असा सवाल नगरसेवक गाडे यांनी केला.

शहर व उपनगर परिसरात कचरा संकलन नियमित होत नसल्याने तसेच दैनंदिन साफसफाई होत नसल्याने स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. तारकपूर परिसरातील सिंधी कॉलनीत गेल्या 8- 10 दिवसांपासून कचरा उचलला गेलेला नाही. त्यामुळे कचऱ्याचा मोठा ढीग साचला असून त्याने संपूर्ण रस्ता व्यापला आहे. परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. याबाबत परिसरातील नागरिक अमित कांजन, रमेश रामरखाणी, मनोहर खुबचंदानी, हरीश काबरा, कुंदनलाल कांजन, गिरीश शर्मा आदींनी या प्रभागाचे नगरसेवक योगीराज गाडे यांच्याशी संपर्क साधून ही समस्या सांगितली. त्यानंतर कचऱ्याचे ढीग पाहून महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.