पाटणा – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे राजकीय वारसदार तेजस्वी गुरूवारी सर्वांना चकित करत विवाहबंधनात अडकले. त्यांनी जणू चट मंगनी, पट ब्याह या हिंदी म्हणीचा प्रत्यय दिला.
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असणाऱ्या 32 वर्षीय तेजस्वी यांचा दिल्लीत साखरपुडा होणार असल्याची माहिती बुधवारी समोर आली. त्यांच्या नियोजित वधूची आणि विवाह केव्हा होणार याविषयीची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली. त्यानंतर अचानकपणे तेजस्वी यांच्या विवाहाची बातमी समोर आली.
दिल्लीतील एका फार्म हाऊसवर संबंधित विवाह सोहळा झाला. तेजस्वी यांनी बालमैत्रिण रॅचेल आयरिस हिच्याशी लगीनगाठ बांधली. तिचे वडील हरियाणातील व्यावसायिक आहेत. विवाह सोहळ्याला लालू, त्यांच्या पत्नी आणि तेजस्वी यांच्या आई राबडीदेवी तसेच दोन्ही कुटूंबांमधील सदस्य उपस्थित होते.
लालूंच्या कुटूंबाशी नातेसंबंध असल्याने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले. गर्दी, धुमधडाका टाळत तेजस्वी साधेपणाने विवाहबद्ध झाले. मात्र, त्यांच्या विवाहाची माहिती पुढे आल्यानंतर बिहारमध्ये राजद कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.