पुणे – वाहनावरील प्रलंबित दंड भरण्यास सांगणाऱ्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून, शिविगाळ करण्यात आली. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महिला पोलीस कर्मचारी त्याच्या कारमध्ये बसल्या. असे असतानाही आरोपीने महिला पोलीस कर्मचाऱ्यासह कार घेवून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्याला मोठ्या शिताफीने कार बाजूला घेण्यास भाग पाडले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी वाहनचालकास अटक केली आहे.
वैभव हरिश्चंद्र जंगम (वय 31, रा. तळवदे, महाबळेश्वर, सातारा) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा वाहतूक विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील चंद्रमा चौकात वाहतूक नियमन व कारवाई करीत होत्या. त्यावेळी जंगम हा त्याच्या ताब्यातील कार घेऊन खडकीहून येरवड्याच्या दिशेने जात होता. चौकात आल्यानंतर फिर्यादींनी त्याच्या कारचे छायाचित्र ई-चलन मशीनवर घेऊन त्याची माहिती घेतली. त्यावेळी वाहनाचा विमा व फिटनेसची वैधता संपल्याचे निदर्शनास आले. त्यावर 600 रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचेही दिसले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला कार बाजुला घेण्यास सांगितले. त्यावेळी जंगम याने कार न थांबविता भरधाव वेगाने पुढे नेली.
फिर्यादीने संबंधित वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार बाराशे रुपयांची दंडाची रक्कम टाकली. त्यानंतर कारचालक जंगम हा फिरून फिर्यादीकडे आला. त्याने फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालून, शिविगाळ केली. त्यानंतर फिर्यादीने त्यास कारसह येरवडा वाहतूक विभागात आणले त्यावेळी जंगम याने पुन्हा कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी या त्याला अडविण्यासाठी गाडीमध्ये बसल्या. त्यावेळी जंगम याने गाडी न थांबविता पुन्हा चंद्रमा चौक, आंबेडकर चौक, चंद्रमा चौकापर्यंत नेली.