पुणे – करोनाच्या काळात जीम बंद असल्याने आर्थिक परिस्थिती खालावलेल्या जीम ट्रेनरने सराफी दुकानातून मंगळसूत्र चोरले. त्याने पत्नीला सोबत घेऊन ही चोरी केली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे.
फिर्यादी राहुल राजेश गायकवाड हे परमार ज्वेलर्स (रास्तापेठ) येथे सेल्समनचे काम करतात. त्यांच्याकडे 30 नोव्हेंबर रोजी आरोपी पत्नीला घेऊन आला होता. त्याने दागिने विकत घेणेचा बहाणा करत मंगळसूत्र दाखवण्यास सांगितले. यानंतर फिर्यादीची नजर चुकवून अंदाजे 22 ग्रॅम वजनाचे 1 लाख 12 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरुन नेले.
गुन्हा दाखल झाल्यावर सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी एका दुचाकीवर जाताना दिसला. पोलिसांना दुचाकीचा नंबर मिळाला. ही गाडी त्याच्या पत्नीच्या नावावर होती. अधिक तपासात जीम ट्रेनर बाळासाहेब प्रदीपकुमार हांडे (35, रा. उंड्री , मुळ वडोदरा गुजरात) यास अटक करण्यात आली.
आरोपी हांडे हा जिम ट्रेनरचे काम करत होता लॉक डाउन नंतर उत्पन्नाचे काहीएक साधन नसल्याने त्याने चोरी केल्याचे कबुल केले. चोरी करताना त्याने पत्नीला सोबत नेले होते. सेल्समनचे लक्ष दुसरीकडे विचलित करुन मंगळसुत्र चोरी केले. त्याच्याकडून मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीमती प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिष गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांचे मार्गदर्शदनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे सुभाष पिंगळे, पोलीस शिपाई महेश जाधव, निलेश साबळे, हेमंत पेरणे, शुभम देसाई, शाम सुर्यवंश सुभाष मोरे,विठ्ठल चोरमले,समिर आवळे यांनी केली आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव करीत आहेत.