मुंबई – राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना आज ईडीने नोटीस बजावली आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याने महाविकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आल्याचे पाहायला मिळत आहे.
बारामती ॲग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या या संबंधित व्यवहार संदर्भात रोहित पवार यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांना पुढील आठवड्यात २४ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीने यापूर्वी छापेमारी केली होती. त्याचसोबत रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड साखर कारखान्यावरही आयकर खात्याने छापे मारले होते.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. तसेच मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत आहे.
त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होते. त्यामुळे आता या सर्व घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच रोहित पवार चौकशीला हजर राहणार की नाही याकडेही राज्याचे लक्ष वेधले आहे.
किशोरी पेडणेकर यांनाही समन्स
ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकणी किशोरी यांना हे समन्स बजावण्यात असून त्यांना 25 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.