पुणे ( प्रतिनिधी) – पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता पुन्हा एकत्र येणार आहे. आश्चर्य वाटेल मात्र या दोन्ही पक्ष सत्तेसाठी नाही तर शहरातील महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एकत्र येणार आहेत. यासंदर्भात सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. तर पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे शहरातील नदी सुधारणा, मेट्रो प्रकल्प, एचसीएमटीआर असे मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी भाजपला राज्य शासनाच्या मदतीची गरज भासणार आहे.
या पार्श्वभूमीवर नवनियुक्त सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पालकमंत्री पवार यांची सकाळी सात वाजताच भेट घेतली. या भेटींने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या, मात्र, बिडकर यांनी त्यांचे खंडन करीत ही भेट केवळ शहराच्या विकासाच्या संदर्भांत होती असे स्पष्ट केले.
ते म्हणाले, या भेटीत शहराच्या विकासकामांत कोणतही राजकारण न आणता विविध योजना आणि प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सभागृहात राष्ट्रवादीकडून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन पवार यांनी दिले असल्याचे बिडकर यांनी सांगितले.