सातारा – सावरकर हिंदू नसून वैदिक धर्माचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करायचे आहे. त्यामुळेच सत्तेचा उपयोग करून भारतीय जनता पक्षाच्या आधाराने सावरकरांचा उदो उदो सुरु आहे, असा आरोप करत “उपरा’कार लक्ष्मण माने यांनी भाजपच्या सावरकर गौरव यात्रेविरोधात येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे उपोषण केले.
भाजपने सुरु केलेल्या सावरकर गौरव यात्रेला पत्रकार परिषद घेऊन माने यांन विरोध केला होता. या यात्रेविरोधात लक्ष्मण माने यांनी केलेल्या आजच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, रावखंडे, रामभाऊ जाधव, ओबोसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत लोकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
लक्ष्मण माने म्हणाले, “”ही बहुजनांची मातृभूमी असून सावरकर आणि वैदिकांची मातृभूमी नाही. सावरकर यांच्या लिखाणात या देशाला पितृभूमी आणि पुण्यभूमी समजतात. पण मातृभूमी समजत नाही. म्हणून ते वंदे मातरम, भारतमाता कधीच म्हणाले नाही. पण आज भाजपचे लोक त्यांच्याच नावावर हे सगळं खपवून त्यांची देशभक्त असल्याची प्रतिमा बनवत आहेत. या सगळ्याला आमचा विरोध आहे.”