सातारा -सज्जनगडावर जात असताना 800 फूट दरीत तवेरा कार कोसळून चालक ठार झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असून शुक्रवारी सकाळी पोलिस, ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर दरीतून मृतदेह बाहेर काढला.
अजित सूर्यकांत शिंगरे (वय 31, रा. सज्जनगड ता. सातारा) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. अजित याचे साताऱ्यात मोबाइल शॉपीचे दुकान आहे. अधूनमधून तो बदली चालक म्हणून काम करत होता. गुरुवारी पुणे येथील एक भाडे मिळाल्याने सकाळी तो लवकर गेला होता.
रात्री घरी जात असताना कार दरीत कोसळून अपघात झाला. सज्जनगड घाटातून कार दरीत कोसळली असल्याचा फोन अजितच्या कुटुंबीयांना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास आला. अपघातात सुमारे 800 फूट खोल दरीत कार कोसळली होती. अपघाताबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे तपास कामाला अडथळा येत होता. शुक्रवारी सकाळी शोध मोहिम राबवण्यात आली. मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी तो जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.