स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने विटा येथून घेतले ताब्यात
उंब्रज – स्थानिक गुन्हे शाखेने कराड तालुक्यातील टोळी प्रमुख व मोका प्रकरणी मोस्ट वॉंटेड असणारा कुख्यात गुंड युवराज साळवी उर्फ अप्पा (रा. कोपर्डे ता. कराड) याच्या विटा (जि. सांगली) येथे मुसक्या आवळल्या. साळवी दोन वर्षापासून फरारी होता. साळवी हा विटा येथे एक फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली होती.सालवी राहत असलेल्या बिल्डिंगभोवती सातारा पोलीसांनी सापळा लावला. साळवी पळून जाण्याच्या तयारीत असताना शिताफीने त्याला पकडले. साळवी याला उंब्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तो मोका गुन्ह्यातील फरार गुन्हेगार होता. जूनमध्ये उंब्रज पोलिसांच्या कारवाईच्या वेळी युवराज साळवे घटनास्थळावरून फरारी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करून फरारी घोषित केले होते. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड पोलीस कर्मचाऱ्यांसह रात्रगस्त करीत असताना शहापूर पिंपरी फाटा परिसरात 16 जून 2019 रोजी मध्यरात्री तीन वाजता मसूर बाजूकडून येणारी वाहने थांबवून तपासायला सुरुवात केल्यावर युवराज साळवे (रा. कोपर्डे हवेली, ता. कराड) हा कारने कोपर्डे हवेलीकडे साथीदारांसह जात होता. कार अडवून विचारपूस केल्यावर युवराज साळवे त्याला ताब्यात घेईपर्यंत अंधाराचा व रस्त्यालगतच्या झाडीचा फायदा घेऊन त्याच्या साथीदारांसह कार तेथेच सोडून पळाला होता.
कारमध्ये एक परदेशी बनावटीचे चार जिवंत राऊंडस असलेले मॅक्झिनलोड पिस्टल, एक गावठी बनावटीचा कट्टा वजा पिस्टल त्यामध्ये जिवंत राऊंड भरलेले मॅक्झीन, एक लाकडी दांडके, मिरचीपूड असे साहित्य आढळले होते. ते कारसह जप्त करुन ताब्यात घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करुन याची माहिती देऊन दरोड्याच्या तयारीतील संशयितांविरुध्द फिर्याद दिली. संशयितांच्या शोधासाठी तीन पथके तयार केली. फरारींचा शोध घेताना त्यापैकी सूरज सर्जेराव पाटील (रा. सुपने हल्ली मंगळवार पेठ, कराड) व आकाश उर्फ पप्या साहेबराव कोळी (रा. माणिकचौक, उंब्रज, हल्ली रा. कोरीवळे, ता. कराड)
यांना अटक केली होती. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज साळवी याचे टोळीचा मोक्का अंतर्गत प्रस्ताव तयार करुन तो मंजूर करुन घेतला. तसेच पुढील तपासकामी पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांचेकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यातील प्रमुख संशयित युवराज साळवे याचा शोध घेताना स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या पथकास यश मिळाले.
अखेर युवराज साळवे याला विटा येथून सापळा रचून पकडण्यात आले. हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, मुबीन मुलानी, शरद बेबले, प्रवीण फडतरे, संजय जाधव यांनी कारवाईत भाग घेतला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड करत आहेत. कराड आणि जिल्ह्यातील गुन्हेगार व टोळ्यांवर यापुढेही ठोस कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.