पुणे – तब्बल 46 लाखांची थकबाकी असल्याने महापालिकेने मंडई परिसरातील कै. सतीशशेठ धोंडीबा मिसाळ पार्किंगला टाळे ठोकले आहे. हे पार्किंग आता महापालिका प्रशासनच चालवणार आहे. त्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाने सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांची मागणी सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे. दरम्यान, हे पार्किंग ऐन सणासुदीच्या काळात बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
पार्किंगची थकबाकी असल्याने 8 ऑगस्टपासून महापालिकेने ते बंद केले आहे. त्यानंतर नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार होती. मात्र, विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने पार्किंग सुरू करण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे आता महापालिकेनेच स्वत: पुढाकार घेऊन स्वत:च हे पार्किंग चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्किंगची क्षमता 345 चारचाकी वाहनांची आहे. तर हे पार्किंग बंद असल्याने शहरात गणेशोत्सव, नवरात्रौत्सवाच्या तसेच दिवाळीच्या काळात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडते.
आणखी दीड कोटी रुपये थकबाकी
शहरात महापालिकेची सुमारे 23 पार्किंग असून, त्यातील काही पार्किंगचालकांनी सुमारे 1 कोटी 46 लाख रुपये थकवले आहेत. अशा पार्किंगलाही टाळे ठोकण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. तसेच ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.