मुंबई – ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर (वय 92 वर्ष) यांची तब्येत खालावली आहे. त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 8 जानेवारीपासून मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्या मोठ्या बहिणीची तब्येत खालावल्याचे समजताच आशा भोसले यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. त्यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लतीदीदींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
त्या म्हणाल्या, “लतादीदींसाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. आम्हीही प्रार्थना करत आहोत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.”
दरम्यान, लतादीदींची तब्येत खालावल्याचे समजताच अनेक नेतेमंडळीही त्यांच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल रुग्णालयात पोहोचले आहेत. लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्येच असून तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे लतादीदींवर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले आहे.
यापूर्वी 27 जानेवारी रोजी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती त्यामुळे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते. मात्र आता पुन्हा तब्येत खालावल्याने त्यांच्यावर व्हेटिलेटरवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, लतादीदींच्या तब्येतीबाबत कोणतीही अफवा पसरू नये यासाठी त्यांच्या तब्येतीची माहिती उपचार करणारे डॉक्टर माध्यमांना सतत देत आहेत.