कुडाळ – जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील जवान प्रथमेश संजय पवार यांच्यावर सोमवारी सकाळी दत्त मंदिरानजीक पटांगणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लहान भाऊ आदित्य पवार यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. पवार कुटुंबीय, मित्रपरिवार, जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी जवान प्रथमेश यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जवान प्रथमेश यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
त्यांचे पार्थिव पुणे येथून सकाळी 7 वाजता पाचवड (ता. वाई) येथे आणण्यात आले. तेथून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून जवान प्रथमेश यांचे पार्थिव सरताळे, कुडाळ,शेते, सोमर्डीमार्गे बामणोली तर्फ कुडाळ, डेरेवाडी येथे नेण्यात आले. त्यांचे पार्थिव घरी पोहोचताच आईने केलेल्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. अंत्ययात्रेत नागरिकांनी “भारतमाता की जय’, “वंदे मातरम्’, “जवान प्रथमेश पवार अमर रहे’, अशा घोषणा दिल्या.