पुणे –वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एसटी, पीएमपी आणि मेट्रोचे पर्याय उभे राहात आहेत. सोबतच खासगी प्रवासी वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून बालेवाडी येथील जकात नाक्याच्या जागेवर “मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’ विकसित केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार असल्याने हा प्रकल्प आता खासगी सहभागातून “पीपीपी’वर विकसित केला जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत त्याला मान्यता दिली. राज्य शासन मान्यता देईल या भरवशावर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. ही मान्यता मिळाल्याने लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. या हबच्या ठिकाणी एसटी, मेट्रो, पीएमपी, रिक्षा तसेच खासगी बसेससाठीही सुविधा असणार आहे.
प्रामुख्याने मुंबईकडून येणाऱ्या तसेच पुढे बंगळुरू, सोलापूर, नगरकडे जाणाऱ्या बसेस आणि राज्यातील इतर भागांतून स्वारगेट आणि शिवाजीनगर तसेच पुणे स्टेशन स्थानकाकडे जाणाऱ्या बसेस शहरात न येता थेट या हबमधून शहराबाहेरूनच गेल्यास शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहेश त्या अनुषंगाने हा हब प्रस्तावित केला होता. सुरुवातीला स्मार्ट सिटी या हबचे काम करणार होती. मात्र, पुढील काही वर्षात स्मार्ट सिटीचा गाशा गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य सभेने नोव्हेंबर 2021 मध्ये हे हब महापालिकेनेच विकसित करावे, असा ठराव मुख्य सभेत मंजूर केला होता. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने हे काम शासनाची मान्यता मिळेल या भरवशावर पीपीपी तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला होता.
जकात नाक्याच्या जागेत ‘हब’
महापालिकेस नवीन जकात उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 1999 मध्ये ही जागा देण्यात आली होती. जकात बंद झाल्याने रिकाम्या पडलेल्या जागेवर स्मार्ट सिटीने शहरातील वाहतूक सुधारणेअंतर्गत एकाच ठिकाणी पीएमपी, खासगी प्रवासी वाहने, एसटी तसेच मेट्रोची सुविधा असावी, या उद्देशाने मल्टिमॉडेल हब प्रस्तावित करत पालिकेस प्रस्ताव पाठविला होता. यातील काही जागा पीएमपी डेपोला देण्यात आल्या. तर, काही जागा शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोसाठी देण्यात आली आहे. उर्वरित जागेवर हे हब होणार आहे.