पुणे – मागील आठवड्यामध्ये पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील खाद्यपदार्थाच्या दुकानातून खरेदी केलेल्या सॅन्डविचमध्ये अळ्या आढळल्या. याबाबत प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेत पुणे विभागाने विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील “अनिता’ नावाच्या दुकानातून प्रवाशाने दि. 13 नोव्हेंबर रोजी सॅन्डविच खरेदी केले होते. त्यांना सॅन्डविचमध्ये अळी आढळून आली. देशमुख यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. यासह या प्रकरणाची माहिती त्यांनी रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांना देखील दिली होती. या तक्रारीचा पाठपुरावा शहा यांनी देखील केला होता.
रेल्वे प्रशासनाने तक्रारीची तातडीने दखल घेतली आहे. इंडियन रेल्वे स्टेशन विकास कॉर्पोरेशनने संबंधित विक्रेत्याला कंत्राट दिले आहे. त्यामुळे पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे पत्र दिले आहे.
संबंधित विक्रेत्याला
25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होणार आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.
प्रवाशांच्या जीवाशी खेळ…
दोन महिन्यांपूर्वी डेक्कन क्वीनमध्येदेखील मिरपुडीमध्ये अळ्या आढळून आल्या होत्या. हे प्रकार म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे आहे. दररोज लाखो प्रवासी खाद्यपदार्थांची खरेदी करतात. रेल्वे प्रशासनाने विक्रेत्यांना नेमून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. विक्रेत्यांनी स्वच्छ आणि चांगल्या दर्जाच्या पदार्थांची विक्री करावी, अशी मागणी होत आहे.