सत्तास्थापनेनंतर बदलीची शक्यता
पुणे – विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल सव्वा महिन्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे पुण्यातील भाजपच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. त्यात महापालिका आयुक्त सौरभ राव यांचीही बदली होण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आयुक्त राव हे 1 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत प्रशासकीय सेवेतील सक्तीच्या प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले आहेत. तेथून परत येण्यापूर्वी अथवा सत्तास्थापन झाल्यानंतर पुढील 1 ते 2 आठवड्यात त्यांची बदली निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यात जिल्हाधिकारी असलेल्या राव यांची 17 एप्रिल 2018 ला महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. या कालावधील जायका प्रकल्प, एचसीएमटीआर प्रकल्पाला गती तसेच मेट्रोसाठीचे आवश्यक निर्णय त्यांच्याच कालावधीत घेण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात कौटुंबिक कारणास्तव त्यांनी राज्य शासनाकडे बदलीसाठी विनंती केली होती.
मात्र, शासनाकडून त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्याबाबत 6 महिन्यांपूर्वी जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र, आता निवडणुका संपताच राव हे प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. यापूर्वीही महापालिकेचे अनेक आयुक्त प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांची बदली झाल्याची उदाहरणे आहेत.
दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटला असला तरी, राज्याच्या नवीन मंत्री मंडळाचा शपथविधी येत्या 28 ला होणार आहे. तर राव हे 2 डिसेंबरला प्रशिक्षण संपवून पुन्हा येणार आहेत. त्यामुळे त्यांची बदली आधीच होते की नंतर याबाबत प्रशासकीय पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहेत.