मंचर – लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची शाळा करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. झूम मिटिंग ऍपद्वारे सुरू केलेल्या ई-लर्निंगचे पालकांसह सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी ही सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यांतील सुमारे 2 हजार 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
दहावीसह इतर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्रणालीचा वापर करून शिक्षकांनी घरबसल्या विद्यार्थ्यांना शिकवावे, याबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संस्था प्रशासनास सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार संस्थेने झूम मिटिंग हे ऑनलाइन ऍप वापरून शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यास सांगितले. या शाळेतील शिक्षकांनी मागील आठवड्यापासून या ऍपचा उपयोग करून विद्यार्थ्यांना त्यांच्या घरामध्येच शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
दहावीच्या 100 विद्यार्थ्यांना लाभ
ऑनलाइन प्रणालीद्वारे एकाच वेळी दहावीचे 100 विद्यार्थी दिवसांतून 3 ते 4 तास विविध विषयांचे शिक्षण घेत आहेत तसेच प्रत्येक विषयाचा तास पूर्ण झाल्यानंतर याच ऍपद्वारे विद्यार्थ्याच्या शंकांचे निरसनही शिक्षक करत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्याचा वेळ सत्कारणी लागत असल्याची भावना पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
3-4 दिवसांपासून न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी शाळेतील इतर वर्गातील विद्यार्थ्याना देखील अशाच प्रकारे ऍपद्वारे दिवसातून दोन ते तीन तास ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे.
– शामल चौधरी, प्रशासन अधिकारी, न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी