नगर – करोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन, जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, चित्रपटगृह, व्यायामशाळा व नाट्यगृहे बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रविवारी (दि. 15) दिला. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व दरवाजे बंद आहेत. मात्र, या आदेशामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील भूसंपादन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे. ऐन मार्च महिन्यात भूसंपादन विभागातील कर्मचाऱ्यांना कार्यालयातच स्थानबद्ध व्हावे लागले आहे.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या आदेशानंतर कालपासून (सोमवारी) जिल्हा क्रीडा संकुलाचे सर्व दरवाजे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी बंद केले. जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व भूसंपादन विभाग, अशी दोन शासकीय कार्यालये आहेत. त्यातील कर्मचाऱ्यांसाठी हे दरवाजे सकाळी साडेनऊ ते दहा व संध्याकाळी सहा ते साडेसहा या वेळेतच उघडतात. मार्चअखेर वसुली, वीजबिले, ट्रेझरीची कामे, प्रशासकीय बैठका व इतर कामांचा व्याप असतो. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयातच स्थानबद्ध व्हावे लागले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या प्रवेशद्वारांतून मुक्तप्रवेश आहे. मात्र, भूसंपादन विभागाच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा क्रीडा संकुलातून बाहेर पडण्यास बंदी आहे. कर्मचाऱ्यांना बाहेर जायचे असल्यास, वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्याबरोबर प्रवेशद्वारापर्यंत यावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुमतीनंतरच कर्मचारी जिल्हा क्रीडा संकुलातून बाहेर पडू शकतात.
मात्र, बाहेर गेलेला कर्मचारी पुन्हा कार्यालयात घेतला जात नाही. त्यामुळे भूसंपादन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मार्चअखेरच्या कामापेक्षा ही डोकेदुखी वाढली आहे. त्यात भूसंपादन विभाग कार्यालयातील इंटरनेट सेवा सातत्याने विस्कळित होत आहे.
भूसंपादन कार्यालयातील शौचालयात पाणी नाही. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे.