बॅंकांना बऱ्याच सुट्या आणि संपाची हाक
पुणे – पुढच्या आठवड्यामध्ये बॅंकांचे कामकाज केवळ तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. या आठवड्यात काही सार्वजनिक सुट्या आल्या आहेत. त्याचबरोबर सरकारी बॅंक कर्मचारी संघटनेने एक दिवसाचा संप जाहीर केला आहे.
पुढच्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी बॅंकांचे कामकाज होईल. बुधवारी गुढीपाडव्यामुळे बॅंकांचे कामकाज होणार नाही. गुरुवारी पुन्हा बॅंकांचे कामकाज सुरळीत राहील. मात्र, शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात कर्मचारी संघटनेने संप करणार आहेत. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन आणि ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशनने 27 मार्च रोजी संप करण्याचे अगोदरच जाहीर केले आहे.
पुढच्या आठवड्यात चौथा शनिवार असल्यामुळे त्या दिवशी बॅंकांचे कामकाज होणार नाही. त्यामुळे या आठवड्यात बॅंकांचे कामकाज केवळ तीन दिवसच होईल.या संपाला बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेनेही पाठिंबा दिला आहे.